तंत्रज्ञानाचा इतिहास : वैश्विक आढावा (भाग १)
प्राचीन काळापासून इसवी सन पूर्व ३००० वर्षांपर्यंत
प्राचीन काळापासून इसवी सन पूर्व ३००० वर्षांपर्यंत
मानवजातीच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच तंत्रज्ञान त्याच्या सोबत राहिलेले आहे. तंत्रज्ञानाची सुरुवात कशी झाली, त्याचा नेमका इतिहास काय आहे, त्याची गरज काय होती आणि त्याचा विकास कसा होत गेला, याचा आढावा आपण ‘तंत्रज्ञानाचा इतिहास : वैश्विक आढावा’ या पाच भागांच्या लेखामध्ये घेणार आहोत. त्यातील या पहिल्या भागात आपण तंत्रज्ञानाची सुरुवात, गरज आणि प्राथमिक अवस्था यांची माहिती घेऊ. (प्राचीन काळापासून इसवी सन पूर्व ३००० वर्षांपर्यंत)
मानवाने तंत्रज्ञान नेमके केव्हा वापरायला सुरू केले, हे नक्की सांगणे कठीण आहे. किंबहुना तंत्रज्ञान हे मानवाच्या अगोदरच्याच काळापासून अस्तित्वात होते, असेच दिसून येते. त्या काळी मानवाचे वेगवेगळे पूर्वज जगाच्या वेगवेगळ्या भागात वास करत होते, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरले होते आणि विकसितही केले होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मानवाचे आजचे स्वरूप हे अनेक रूपांमधून उत्क्रांत होत होत निर्माण झाले आहे. अगदी पूर्वी, जेव्हा मानव माकडाच्या रुपात होता, तेव्हापासूनच मानवाने काही साधने (Tools) निर्माण करणे सुरू केले होते. आजही आपण माकडांकडे किंवा इतर काही प्राण्यांकडे पाहिले, तर आपल्याला याची प्रचिती येते. हे प्राणी भटकत असताना, अन्न शोधत असताना किंवा शिकार करत असताना, आजूबाजूलाच आढळणाऱ्या काठ्या, दगड अश्या वस्तू वापरताना आपण पाहतो. सुरुवातीला आपल्याला त्यात काहीच खास वाटत नाही, परंतु बारकाईने पाहिल्यास असे स्पष्ट दिसून येईल, की कोणत्याही भौतिक शास्त्राचे किंवा पद्धतीचे ज्ञान नसूनही, हे प्राणी साधने (Tools) निर्माण करतात, किंवा एखादे काम करण्याची सोपी पद्धत शोधून काढू शकतात. कदाचित अशाच क्षमतांमुळे मानवाच्या पूर्वजांपासूनच त्याला साधने निर्माण करण्याची कला अवगत झाली असावी.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात, उगम, हा गरजेतून होतो. तंत्रज्ञानाचा उगमही गरजेतूनच झाला. त्याकाळी मानव भटके आणि अत्यंत कठीण असे जीवन जगत होता. खूप खटपट करून अन्न मिळवावे लागे. हिंस्र जनावरांची भीती होती, त्यामुळे स्वसंरक्षणासाठीही खूप धडपड होती. योग्य तंत्राच्या अभावाने शिकार करणेही सोपे नसे. हरेक बाबतीत संघर्ष अटळ होता. नैसर्गिक आपत्तींना तोंड देणे तर अत्यंत अवघड होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे येणारी ही संकटे, ऋतुबदल, विविध आजार, स्वच्छतेचा अभाव अशा अनेक समस्या होत्या. प्रत्येक गोष्टीत अनियमितता आणि अनिश्चितता होती. केवळ जगण्यासाठी चाललेली दुर्दम्य धडपड होती आणि निसर्गासमोर वारंवार होणारी हार होती.
पण असे जरी असले, तरी मानवाकडे अद्भुत क्षमताही होत्याच. गोष्टींचे निरीक्षण करून त्यातून विचार करून निष्कर्ष काढण्याचे कौशल्य त्याला अवगत होते. प्रयोगशील आणि चंचल बुद्धी होती. त्यामुळे मानव गप्प कधीच बसला नाही. सातत्याने नवनवीन गोष्टींवर प्रयोग करत राहिल्याने, निसर्गाचे निरीक्षण करत राहिल्याने अनेक गोष्टींचे गूढ उकलत चालले. आपल्या या संघर्षमय जीवनात आपल्या प्रयोगशील बुद्धीमुळे सुसूत्रता येऊ शकते, हे मानवाला जाणवले. त्यातूनच मग विविध प्रकारे समस्या सोडवण्यावर अभ्यास सुरू झाला. चुका करणे, त्या सुधारणे, पुन्हा चुका करणे, कधीकधी स्वतःवरच प्रयोग करणे, फसलेल्या प्रयोगातून स्वतःवर संकट ओढवून घेणे; पण त्यातूनही पुन्हा प्रयत्न करत राहणे अशा खडतर मार्गाने मानवाचा तंत्रज्ञानप्रवास सुरू झाला. आपल्याला आज हे सर्व वाचल्यावर खुळचटपणाचे वाटते. तसे वाटणे स्वाभाविक आहे, मात्र हा प्रवास केल्यामुळेच, हा खुळचटपणा केल्यामुळेच मानवाची विवेकबुद्धी जागृत आणि विकसित होत गेली आहे. आजची आपली बुद्धी ही, या खडतर प्रवासाचेच प्रतीक आहे.
मात्र, सुरुवातीच्या काळात निर्माण झालेले हे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असलेले तंत्रज्ञान स्थिर व्हायला बराच कालावधी जावा लागला. विशिष्ट कृती साध्य करणारी, आणि वापरास सोईस्कर अशी परिपूर्ण साधने निर्माण होण्यास हजारो वर्षे गेली, असे तज्ज्ञ म्हणतात. अर्थातच, चुकांमधून शिकण्याचा मानवाचा कालावधी खूपच मोठा होता. (आणि अजूनही तो शिकतच आहे असे म्हणावे लागेल.) मानवाच्या पूर्वजांनी साधारण इसवी सन पूर्व ७०,००० वर्षे, (निएंडरथल मानवाच्या काळापर्यंत) साधने निर्मिती करण्यात बरेच प्राविण्य मिळवले. यापेक्षा उत्क्रांत, हातोड्यासारखी दिसणारी साधने क्रो-मॅगनॉन (होमो सेपियन जमातीचे पूर्व स्वरूप. इसवी सन पूर्व अंदाजे ३५,००० च्या दरम्यान) मानवाने निर्माण केली. यांत्रिक गुणधर्म असलेली आणि अधिक प्रगत साधने, (जसे की कुंभारकाम आणि विणकाम) ही नवाश्मयुगात आणि धातुयुगात (इसवी सन पूर्व ६,००० ते ३,००० च्या दरम्यान) निर्माण होत गेली.
महत्त्वाकांक्षी अश्मयुगीन मानव (सौजन्य : Gugatchitchinadze, CC BY-SA 4.0, विकिमिडिया कॉमन्स)
शेवटच्या हिमयुगानंतर, साधारण १५,००० ते २०,००० वर्षांपूर्वी, नवाश्मयुगीन कालखंड सुरू झाला. याच काळात भटकत जीवन जगणारा, शिकार करणारा आणि छोटे-छोटे समुदाय करून राहणारा मानव अधिकाधिक स्थिर होऊ लागला. या काळात मानवाला अनेक क्रांतिकारक शोध लागले. सुरुवातीला, मानवाने हाडे, लाकूड, गवत, पाने आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा वापर करून साधने निर्माण केली. पण, ही साधने फारशी टिकाऊ नसल्याने इतर पर्यायाचाही विचार होऊ लागला. दगड अर्थात अश्म, त्यावर उत्तम पर्याय होता. त्यामुळे मानवाने अधिकाधिक दगडांचा हत्यारे तयार करण्यासाठी वापर केला. दगडांना आकार देणे, त्यांना धार काढणे आणि आणि लाकूड व गवताचे धागे वापरून त्यांना दांडा बसवणे या कार्यात मानवाने निपुणता प्राप्त केली. विविध वापरांसाठी विविध साधने निर्माण झाली. नंतरच्या काळात पूर्णतः विकसित आणि विशिष्ट कार्यासाठी प्रभावीपणे वापरता येणारी कुऱ्हाडीसारखी साधने निर्माण होऊ लागली.
अश्मयुगीन हत्यारे (सौजन्य : Britannica – History of Technology, मूळ स्रोत)
या काळात भाले, बाण, धनुष्य, फासे, आणि इतर अनेक अवजारे व शस्त्रे निर्माण झाली. मानवाने अगदी प्राथमिक अवस्थेतील साधनांपासून अगदी आधुनिक शस्त्रे आणि अवजारे विकसित केली. त्यांचा नंतरच्या काळात शिकार, शेती, मासेमारी आणि फासेपारध यांच्यासाठी वापर होऊ लागला. याच काळात चाक निर्माण झाले. डोंगरउतारावरून गडगडत खाली येणाऱ्या ओंडक्यांकडे पाहून मानवाला चाकाची कल्पना सुचली असे म्हटले जाते. परंतु चाकाचा शोध नेमका कसा लागला हे अस्पष्ट आहे. मेसोपोटेमियामधील मानवी संस्कृतीने चाकाचा शोध लावल्याचे म्हटले जाते. परंतु चाकांचा वापर अनेक मानवी संस्कृतींनी केला असावा आणि कदाचित एकाच वेळी अनेक संस्कृतींनी स्वतंत्रपणे चाकाचा शोध आणि विकास केला असावा, असेही एक मत आहे. परंतु याबाबतीत निश्चित काहीच सांगता येत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. नवाश्मयुगाच्या शेवटच्या काळात फिरणाऱ्या चकतीच्या स्वरूपातील चाके वापरात आली.
गतीचे द्योतक : चाक (सौजन्य : Petar Milošević, CC BY-SA 4.0, विकिमिडिया कॉमन्स)
मृण्मय तंत्र (सौजन्य : Gary Todd, CC0, विकिमिडिया कॉमन्स)
मानवाने याच काळात माती आणि चिखलाचा वापर करून भांडी आणि गाडगी तयार केली. मातीला आकार देऊन आणि तिला पक्के करून वापरायोग्य साधनांत परिवर्तित करण्याचे तंत्र मानवाने विकसित केले. मानवाने विटा आणि इतर मातीच्या वस्तूही तयार करणे सुरू केले. ही भांडी तयार करण्यासाठी नंतरच्या काळात फिरती चाकेही वापरली जाऊ लागली, परंतु मातीच्या गोळ्याला हाताने आकार देऊन घडवणे हे काळ त्यांना पक्के करण्यासाठी सूर्यप्रकाश आणि अग्नी या दोघांचाही उपयोग केला.
हे शोध सर्वांत महत्त्वपूर्ण ठरले. दोन वाळलेल्या लाकडी काटक्या एकमेकांवर सातत्याने घासल्याने, गुळगुळीत दगड एकमेकांवर आपटल्याने अग्नी निर्माण होऊ शकतो याचे मानवाला ज्ञान झाले. हे नेमके कधी झाले हे सांगणे कठीण असले तरी या घटनेने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवला. अग्नीमुळे मानवाला ऊर्जा आणि तिचा वापर यांबद्दल ज्ञान प्राप्त झाले. पुढे अग्नीचा वापर कितीतरी कारणांसाठी केला जाऊ शकतो हे मानवाला जाणवत गेले. सुरुवातीला अग्नी हा हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी केला जाऊ लागला. नंतर त्याचा ऊर्जा आणि अन्न भाजण्यासाठीही उपयोग केला जाऊ लागला. अग्नीमुळे शस्त्रास्त्रे आणि मृण्मय वस्तू यांच्या निर्मितीत प्रगती झाली.
शेतीमुळे मानवास स्थैर्य प्राप्त झाले. मानवाने पशुसंवर्धनाचे तंत्र विकसित केले. त्यामुळे मानवाचे जीवन हे छोट्या समुदायांमधून वस्त्यांमध्ये रूपांतरित झाले. जंगलांमध्ये आढळणाऱ्या विविध धान्यांच्या आणि आणि वनस्पतींच्या बीजांचे संकलन करून त्यांची पेरणी करणे साधारणतः ११५०० वर्षांपूर्वी सुरू झाले. साधारणतः १०००० वर्षांपूर्वी पशु पाळणे आणि त्यांचे संवर्धन करणे मानवाने आत्मसात केले. या दोन्हीही गोष्टींमुळे मानवाला प्रचंड प्रगती साधता आली. शेतीमुळे मानव अन्नाच्या बाबतीत सार्वभौम होऊ लागला. शेतीला पूरक असणाऱ्या पशुसंवर्धन व्यवसायामुळे मानवाला शेतीच्या कामांसाठी, वाहतुकीसाठी आणि इतर अनेक उपयोगांसाठी संसाधने प्राप्त होऊ लागली. वाहतुकीच्या बैलगाडीसारख्या साधनांचा वापर सुरू झाला.
या काळात इमारती आणि घरे बांधण्याची कला मानवाला आत्मसात झाली. मानव गुहांसारख्या नैसर्गिक आसऱ्यातून बाहेर पडला आणि भाजक्या विटांची पक्की घरे आणि पक्क्या झोपड्या बांधण्याची सुरुवात झाली. फक्त राहण्यासाठीच नाही, तर कलाकृती आणि धार्मिक भावनांच्या अभिव्यक्तीसाठीही पक्की आणि कलात्मक बांधकामे केली गेली. उद्योग आणि वाहतूक क्षेत्र निर्माण आणि विकसित होऊ लागले. बैल, म्हशी, घोडे, गाढवे, रेडे असे प्राणी गाड्यांसाठी ऊर्जास्त्रोत म्हणून वापरले जाऊ लागले. मानवाचे कष्ट त्यामुळे बरेच कमी झाले.
नवाश्मयुगाच्या शेवटच्या काळात अनेक छोटे छोटे उद्योग निर्माण होऊ लागले. वस्तूनिर्मिती सामूहिक पातळीवर होऊ लागली. सुरुवातीच्या काळात वल्कले धारण करणारा मानव वस्त्रे विणू लागला. वस्त्रोद्योग निर्माण होऊ लागले. दगडी जाते असणाऱ्या गिरण्या, मातीच्या वस्तूंचे उद्योग, रंगोद्योग, उर्ध्वपातन आणि शेतीला पूरक असणारे उद्योग उभे राहिले. उत्तर नवाश्मयुगात धातूंचा शोध लागल्यानंतर त्यांवर आधारित असणारे, सोने, चांदी, तांबे आणि कथिल यांसारख्या मऊ धातूंवर प्रक्रिया करणारे उद्योगही निर्माण झाले.
स्टोन हेंज (सौजन्य : Tinytimrazz, CC BY-SA 4.0, विकिमिडिया कॉमन्स)
थोडक्यात, तंत्रज्ञानाचा मानवी आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झाला. तंत्रज्ञान निर्माण झाल्यापासून मानवाचे कष्ट कमी होऊ लागले. तंत्रज्ञान संथगतीने विकसित होत गेले, परंतु त्याने मानवाचे जीवन बदलून टाकले. या भागात आपण तंत्रज्ञानाच्या प्राचीन आणि अश्मयुगीन प्रवासाची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञानाचा प्राचीन प्रवास फारच व्याप्त आहे. त्यामुळे लिहू तितके कमीच आहे. तरीही सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे लेखाच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील भागात आपण नवाश्मयुगाच्या शेवटापासून ते मध्ययुगाच्या सुरुवातीपर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास पाहू…!
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!