तंत्रज्ञानाचा इतिहास : वैश्विक आढावा (भाग २)
इसवी सन पूर्व साधारणतः ३००० ते इसवी सन ५०० पर्यंत
इसवी सन पूर्व साधारणतः ३००० ते इसवी सन ५०० पर्यंत
यामागील भागात आपण पाहिले, की तंत्रज्ञानाची सुरुवात कशी झाली, त्याची गरज काय होती, प्राचीन काळापासून तंत्रज्ञानाचा प्रवास कसा झाला आणि नवाश्मयुगापर्यंत जगामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या. या दुसऱ्या भागामध्ये आपण नागरीकरणाची सुरुवात आणि तंत्रज्ञानाचा पुढील प्रवास पाहणार आहोत. या प्रवासाचा कालखंड नवाश्मयुगाच्या शेवटापासून मध्ययुगाच्या सुरुवातीपर्यंत आहे. (इसवी सन पूर्व साधारणतः ३००० ते इसवी सन ५०० पर्यंत)
आतापर्यंत आपण पाहिलेला तंत्रज्ञानाचा प्रवास हा फारच संथ गतीने झाला आणि मानवाच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्याशी निगडित समस्या सोडवण्यावरच तंत्रज्ञानाचे लक्ष केंद्रित राहिले. परंतु तंत्रज्ञानाबरोबरच मानवी जीवनाचे इतर पैलूही विकसित होत होते. मानव सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही विकसित होत चालला होता. धर्म, श्रद्धा, भाषा, संस्कृती, कला, विविध शास्त्रे याही संकल्पना नव्याने निर्माण झाल्या आणि विकसित होत गेल्या. सुमारे ५००० वर्षांपूर्वी ही विकासप्रकिया सुरू झाली. याच काळात नागरीकरण सुरू झाले. त्यामुळे नव्या गरजा, नव्या वस्तू, नवनिर्माणही सुरू झाले. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळाली.
आपण हे पाहिले की शेतीमुळे मानवाला स्थिरता आली. त्यामुळे अनेक नवी कौशल्ये आणि माध्यमेही निर्माण होऊ लागली. त्यातून विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उत्पादनांची गरज निर्माण झाली. ही गरज पूर्ण करणाऱ्या अनेक व्यवसायांना आणि पेशांना चालना मिळाली. त्यामध्ये मुख्यतः धातूकाम, आणि धातूंच्या वस्तू तयार करणारे कुशल कारागीर होते. सुरुवातीला धातूंना गरम करणे आणि त्यांना बडवून आकार देणे अश्या कौशल्यांचा विकास झाला. हे धातू मऊ असल्याने आणि निसर्गात शुद्ध स्वरूपात मिळत असल्याने त्यांना घडवणे सोपे होते. त्यात सोने आणि तांबे या धातूंचा समावेश होता. जसजसे ही कौशल्ये विकसित होत गेली, तसतसे मानवास धातू शुद्ध करण्याचे तंत्रही अवगत होऊ लागले. मिश्र आणि खनिज स्वरूपात मिळणार्या धातूंना आगीवर तापवून शुद्ध स्वरूपातील धातू मिळणे शक्य आहे, याची मानवास जाणीव झाली. अश्या प्रकारे प्रथम शुद्ध केलेला धातू तांबे होय. या अत्यंत महत्त्वपूर्ण यशामुळे मानवाने या क्षेत्रात अधिक प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि धातूशास्त्राचा उगम झाला. त्यातून पुढे अनेक नव्या संधीही निर्माण झाल्या. नव्याने निर्माण होत चाललेल्या कौशल्यांमुळे आधुनिक आणि प्रगत वसाहती निर्माण होत चालल्या. या वसाहतींनी भाषा, कला, शास्त्रे, अंक आणि मोजमाप, संस्कृती, तत्वज्ञान, व्यापार, वस्तुनिर्मिती आणि उद्योग अश्या अनेक क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. अर्थातच, या क्षेत्रांमधील प्रगत आणि महत्त्वपूर्ण कौशल्ये असणारा समाजगट फारच लहान होता. परंतु, तरीही या गटाला समाजात फार उच्च स्थान होते; कारण या गटाने त्यांना असणार्या ज्ञानाला पुढे पाठवण्यासाठी माहितीची माध्यमे निर्माण केली आणि त्या योगाने त्याचा प्रसार केला.
आतापर्यंत जे काही ज्ञान मानवाने प्राप्त केले होते, त्यात विज्ञानाचे अस्तित्व नव्हते, कारण अजूनही सुसंबद्ध शास्त्रे आणि संशोधन पद्धती निर्माण झाल्या नव्हत्या. मात्र, याच वेळी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. सुमेरियन खगोलतज्ज्ञांनी निरिक्षणे आणि गणितीय मोजमापाच्या माध्यमातून खगोलीय पिंडांची अचूक स्थाने शोधण्यात यश मिळावले. त्यातूनच मग दिनदर्शिका आणि सिंचनयंत्रणा निर्माण केली गेली. इथेच पहिल्यांदा विज्ञान, निरिक्षणे आणि शास्त्रे यांचा प्रयोग, प्रत्यक्ष मोजमाप आणि आणि त्यांची पडताळणी यांच्याशी संबंध आला. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उगम झाला…! हळूहळू समाजाची विज्ञानाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. इसवी सन पूर्व ३००० वर्षांच्या सुमारास मानवाने क्षेत्रमापन, वजन, अंतर, कालमापन इ. चे अचूक कौशल्य प्राप्त केले. अत्याधुनिक आणि ज्ञानाधिष्ठीत समाजाच्या दिशेने मानवाने पहिले पाऊल टाकले…!
मानवाने या काळात धातू आणि त्यांच्या वापराचे उत्तम कौशल्य प्राप्त केले. सुरुवातीच्या काळात तांबे, चांदी आणि सोन्यासारख्या मऊ धातूंवर काम केले गेले. पण ते मुळातच मऊ असल्याने त्यांचा वापर शोभेच्या वस्तू आणि दागदागिने यासाठीच प्रामुख्याने झाला. या धातूंना अधिक कठीण बनवून त्यांपासून शस्त्रे आणि विविध वापरायोग्य वस्तू बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन किंवा अधिक धातूंच्या खनिजांना एकत्र मिसळून त्यांना अग्नीने तापवले असता त्यापासून मिश्रधातू बनू शकतो, याचा मानवास प्रत्यय आला. त्याच माध्यमातून मानवाने तांबे आणि कथिल यांचे मिश्रण करून कांस्याची निर्मिती केली. कांस्याचा या काळात फार जास्त प्रमाणावर वापर झाला. मानवाने शिसे, अँटिमनी आणि अर्सेनिक यांचेही तांब्याबरोबर मिश्रण केले आणि कांस्याचे विविध प्रकार निर्माण झाले. कथिलाचे कांस्य मात्र सर्वांत लोकप्रिय ठरले आणि त्याचा शस्त्रे, शिल्पे, भांडी, अलंकार आणि इतर अनेक वस्तू निर्माण करण्यासाठी उपयोग झाला. मानवाने धातूंचा भरपूर वापर सुरू केला. त्यामुळे धातूंची अखंड उपलब्धता गरजेची झाली. त्यासाठी मानवाने आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमध्ये फिरायला सुरुवात केली. धातूंचा व्यापारही सुरू केला. त्यासाठी मानवाने सुपिक आणि गाळाचा प्रदेश सोडून खडकाळ आणि डोंगराळ प्रदेशात शोध सुरू केला. अनेक संस्कृतींतील लोकांनी आपली मूळ स्थाने सोडून दूरदूरपर्यंत प्रवास आणि व्यापार सुरू केला. त्यातूनच अनेक खुष्कीचे आणि समुद्री व्यापारी मार्गही निर्माण झाले.
हा धातूंचा वाढता वापर आणि विकास जर सोडला, तर इतर सर्व क्षेत्रांतील तंत्रज्ञानाची प्रगती ही फारच संथ गतीने सुरू होती. हळूहळू अनेक क्षेत्रे विकसित होत गेली. बांधकाम, वाहतूक, व्यापार, ऊर्जा क्षेत्रांत टप्प्याटप्प्याने बदल घडले. धातुकामासाठी, काचकामासाठी तसेच मृण्मय वस्तूंसाठी भट्ट्यांचा वापर उल्लेखनीय ठरला. जलवाहतूकीचे नवे माध्यम निर्माण झाले. सुरुवातीच्या काळात तराफे वापरून जलवाहतूक केली जायची. त्यांचा आकार नंतर बदलत जाऊन नौकेसारखा एक विशिष्ट आकार त्यांना प्राप्त झाला. त्याचप्रमाणे शिडाचा उपयोग करून वार्याच्या ऊर्जेपासून चालणार्या छोट्या नौकाही मानवाने विकसित केल्या. इजिप्तमधील संस्कृतींनी त्यांचा प्रथम वापर केला. या नौका मोठ्या नद्यांमध्ये तसेच समुद्रांमध्येही प्रवास करू शकत होत्या. त्यामुळे जलप्रवास आणि नौकानयन यांनाही चालना मिळाली.
रूमानियात आढळलेली कांस्याची हत्यारे (सौजन्य : रूमानिया सरकार, समाजासाठी मुक्तपणे उपलब्ध, विकिमिडिया कॉमन्स)
युरोपीय कांस्य दागिने (सौजन्य : Gary Todd, झिनझेंग प्रांत, चीन, CC0, विकिमिडिया कॉमन्स)
शेतीचा या काळात फार वेगाने विकास झाला. नवनवीन पद्धती आणि तंत्रे यांचा कल्पकरित्या वापर सुरू झाला. मुख्यत्वे करून शास्त्रीय आणि पद्धतशीर सिंचनपद्धती विकसित केल्या जाऊ लागल्या. इजिप्त आणि मेसोपोटेमियामधील वसाहती या नाईल आणि टायग्रिस-युफ्रेटिस नद्यांवर सिंचनासाठी अवलंबून होत्या. या नद्यांनी हा प्रदेश अत्यंत सुपीक केला होता. त्यांना नियमितपणे येणार्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणावर गाळ आणि सुपिक मृदा नदीखोर्यांत पसरत असे. त्यामुळे या भागात शेतीला प्रचंड वेग आला. सुटसुटीत आणि पद्धतशीर सिंचनपद्धती प्रगत आणि क्लिष्ट होत्या. त्यांना फार जागरूकतेने नियंत्रित केले जात असे तसेच पाण्याचा योग्य आणि न्याय्य पद्धतीने उपयोग व्हावा यासाठी नियमावलीही तयार करण्यात आल्या होत्या; असे दिसून येते. टायग्रिस-युफ्रेटिस नदीखोर्यात येणारे महापूर हे अधिक उग्र आणि अनिश्चित स्वरूपाचे होते. त्यामुळे तेथील सिंचन यंत्रणेवर आणि कालव्यांवर त्यांचा परिणाम झाला. त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचून सिंचन करणे अवघड होऊ लागले; त्यामुळे या सिंचनपद्धती अधिक वैविध्यपूर्ण झाल्या. सुमेरियन अभियंत्यांनी उन्हाळ्याच्या काळात पाणी नदीतून वळवून, तळ्यांमध्ये साठवायला सुरुवात केली. नंतर हेच पाणी शेतांमध्ये सिंचनासाठी वापरायला सुरवात केली. परंतु क्षारांच्या आणि मातीच्या अवसादामुळे जमिनीची सुपिकता बिघडली; त्यामुळे ही पद्धत बंद पडली.
प्राचीन सिंचन व्यवस्थेचे काही अवशेष (सौजन्य : Shankar S., दुबई, संयुक्त अरब अमिरात, CC BY 2.0, विकिमिडिया कॉमन्स)
नवाश्मयुगात सुरू झालेली उत्पादने या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाऊ लागली, तसेच उत्पादनप्रक्रियेत नाविन्य आले. विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू, सुगंधी द्रव्ये, तेले आणि मद्य यांचे उत्पादन आणि व्यापार सुरू झाला. हा व्यापार धातुयुगाच्या अगोदरच सुरू झाला होता आणि त्या बदल्यात धातू विकत घेतले जात होते; पण या काळात हा व्यापार अधिक विकसित झाला. या काळात मातीच्या भांड्यांसाठी फिरत्या चाकांचा वापर वाढला. सुगंधी अत्तरे आणि तेले यांचा वापर आणि उत्पादन वाढले. त्या माध्यमातून शिजवणे, अर्क काढणे आणि टिकाऊपणा वाढवणे या प्रक्रियांचा विकास झाला आणि मूलभूत रसायनशास्त्राचा उगम झाला. पाककृती आणि रसायनांच्या प्रक्रियांमधून सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती झाली. वजन वाहून नेण्यासाठी आणि वाहतुकीसाठी ओझेवाहू प्राणी वापरले जात होतेच, पण या काळात प्राण्यांच्या शक्तीने चालणार्या गाड्या आणि वाहने वापरात आली. ही वाहने पुढे व्यापार, उद्योग आणि युद्धांमध्येही वापरली गेली.
महत्त्वपूर्ण ऐतिहसिक व्यापारी मार्ग (सौजन्य : Internet Archive Book Images, निर्बंधरहित, विकिमिडिया कॉमन्स)
नवाश्मयुगाच्या शेवटच्या काळात मेसोपोटेमियातील वसाहतींनी भाजक्या विटा निर्माण करण्यात प्राविण्य मिळवले होते आणि त्या माध्यमातून बांधकामेही केली होती. नंतरच्या काळात या पद्धतींचा विकास होऊन त्यातून चौकोनी आकाराची मंदिरे बांधली गेली. इजिप्त आणि आजूबाजूच्या वाळवंटी प्रदेशात मातीचे प्रमाण अत्यल्प होते पण दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यांचा वापर करून इजिप्तमधील वसाहतींनी मंदिरे आणि पिरॅमिडसारखी मोठी स्मारके बांधली. पायर्यापायर्यांनी खडक वरती चढवून, त्यांना कौशल्यपूर्ण प्रकारे आकार देऊन विशिष्ट शैलीत बसवले गेले. या इमारतींची रचना करणारे लोक नक्कीच गणित आणि खगोलशास्त्रांत प्रविण होते, असे दिसून येते. या वास्तूंना खगोलीय वस्तूंशी संरेखित केलेले दिसून येते. इतक्या मोठ्या आकाराच्या या रचना बांधण्यासाठी प्रचंड मनुष्यबळाची गरज होती. ही गरज मुख्यत्वे गुलामांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली असावी. त्या काळात विकसित झालेल्या युद्धकला आणि सैन्यसंघटन यांमुळे आपल्या राज्यांच्या सीमा विस्तारित करून शक्तीमान वसाहतींनी हे गुलाम संकलित केले असावेत आणि त्यांना या कामी वापरले असावे असे वाटते.
याच काळातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे शास्त्रांचा आणि ज्ञानाचा विकास आणि प्रसार. मुख्यतः कुशल कारागिरांनी आणि व्यापार्यांनी या ज्ञानाचा, शास्त्रांचा आणि कौशल्यांचा प्रसार केला. ख्रिस्तपूर्व दुसर्या सहस्राब्दीपर्यंत हे ज्ञान पिढ्यापिढ्यांनी पुढे नेले आणि तेथून पुढे ते वेगाने पसरत गेले. लोह आणि त्याचा वापर याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मानवाचे जीवन आमूलाग्र बदलले.
गिझाचे पिरॅमिड्स (सौजन्य : Ricardo Liberato, CC BY-SA 2.0, विकिमिडिया कॉमन्स)
रोमन स्थापत्याचा नमुना – Acueducto de Segovia (सौजन्य : Manuel González Olaechea y Franco, CC BY-SA 3.0, विकिमिडिया कॉमन्स)
ग्रीक आणि रोमन संस्कृतींचे तंत्रज्ञानातील सर्वात महत्वपूर्ण योगदान म्हणजे लोह वितळवण्याचे तंत्र..! ॲनाटोलियामध्ये इसवी सन पूर्व १००० सुमारास या तंत्राचा शोध लागला असावा. या प्रदेशांमध्ये धातू मोठ्या प्रमाणावर वापरले जात होतेच. लोहाचाही वापर हळूहळू सुरू झाला आणि पाश्चात्य वसाहतीतही पसरत गेला. लोह हे कांस्यासारखे सहज हाताळता येणारे नव्हते. ते लवकर शुद्ध स्वरूपात मिळत नसे. त्याला आकार देणे आणि साच्यांमध्ये घडवणेही त्रासदायक होते. त्याला वितळवण्यासाठी प्रचंड तापवावे लागे. तेवढे तापमान मिळवण्यासाठी जास्त क्षमतेच्या भट्ट्या हव्या होत्या आणि नेहमीच्या भट्ट्यांना भात्याने हवा देऊनही तितके तापमान सहजासहजी मिळत नसे. अनेक तास गरम केल्यावर स्पंजासारखा लोहधातू मिळत असे. त्याला बडवून त्याच्या सळ्या निर्माण केल्या जायच्या आणि नंतर आवश्यकतेप्रमाणे गरम करून आकार देऊन वस्तू बनवल्या जायच्या. नंतरच्या काळात लोहाला टणकपणा देण्यासाठीचे तंत्रही वापरात आले. त्यापासून उत्तम दर्जाची शस्त्रे बनवली जाऊ लागली.
याच काळात ग्रीस आणि रोममध्ये यामिकीचा आणि यंत्रांचा विकास झाला. आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने शस्त्रनिर्मिती आणि मूलभूत यामिकीमध्ये अनेक संशोधने केली. त्सेसिबियाॅस आणि हिरो या शास्त्रज्ञांनी अनेक उपकरणे आणि साधने निर्माण केली, ज्यांचा अगदी मूलभूत पातळीपासून अगदी क्लिष्ट पातळीपर्यंत विकास झाला. त्यांना खऱ्या अर्थाने यंत्रे म्हणणे शक्य होते इतकी ती विकसित झाली. पुढे अश्याच उपकरणांचा रोमन लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग केला. त्यांनी फिरत्या संयंत्रांचा आणि वर्तुळाकार गतींचा याऱ्या आणि पंपांसाठी उपयोग केला. त्यांनी वाहत्या पाण्यावर चालणाऱ्या फिरत्या चाकांचाही ऊर्जेसाठी वापर केला. ग्रीक-रोमन प्रदेशांत शेतीमध्ये देखील धातूंचा कल्पकतेने वापर सुरू झाला. धातूंपासून नांगर आणि अवजारे तयार करण्यात आली. परंतु ही अवजारे म्हणावी तितकी सक्षम नसल्याने मनुष्यबळ लागत होतेच.
स्थापत्य आणि बांधकामात ग्रीकांनी तांत्रिकदृष्ट्या विशेष कामगिरी केली नाही; परंतु रोमन लोकांनी केली. त्यामध्ये भाजक्या विटा आणि दगडांचा कल्पक वापर, विशिष्ट प्रकारचे आणि पाण्यातही टिकणारे सूक्ष्मकणी सिमेंट यांचा समावेश होता. त्यांनी पुढे घुमट, कमान आणि घुमटाकार छप्परे निर्माण करण्यात प्राविण्य मिळवले. केवळ तांत्रिकच नाही, तर कलात्मक दृष्टीनेही हे सर्व बांधकाम प्रकार सुंदर होते. त्यांनी हे प्रकार विविध मंदिरे, रस्ते, पूल, इमारती, दीपगृहे, बोगदे यांमध्येही वापरले.
ग्रीक आणि रोमन लोकांनी बारीक धातुकाम, मातीच्या वस्तू, कलाकृती, काचकाम, विणकाम, चर्मकाम, अलंकार या अनेक क्षेत्रांत प्राविण्य मिळवले आणि त्यांचा व्यापारही केला. त्यांनी जहाजनिर्मितीत प्राविण्य मिळवले, जहाजाच्या तांत्रिक भागांचा विकास केला, त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा हूल, जहाजबांधणीचे तंत्र, चौकोनी शिडे यांचा विकास केला. रस्त्यांचे उत्तम जाळे निर्माण केले. ही रचना अतिशय धोरणात्मक होती. त्यांच्या माध्यमातून व्यापार आणि सैन्याच्या हालचाली सोईस्कर झाल्या.
युद्धकला आणि सैन्यसंघटन, शस्त्रविद्या आणि अनुशासन या क्षेत्रांतही या लोकांनी यश मिळवले. विविध प्रकारची अस्त्रे, भाले, तलवारी आणि विविध क्लिष्ट हत्यारे त्यांनी निर्माण केली. ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत वैचारिक आणि गणितीय सिद्धांत मांडण्याचे कार्य अनेक ग्रीक आणि रोमन विचारवंतांनी केले. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत विचारवंत, तत्वज्ञ, संशोधक, कलाकार आणि अभियंत्यांचाही समावेश आहे.
या भागात आपण नवाश्मयुगाच्या शेवटापासून सुरुवात करून मध्ययुगाच्या सुरुवातीपर्यंतचा (म्हणजे साधारणतः इसवी सन ५०० पर्यंत) तंत्रज्ञानाचा प्रवास थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. या काळात तंत्रज्ञान अधिक सुसूत्र आणि प्रगल्भ झाले. हा कालावधी आणि त्यात लागलेले शोध आधुनिकतेचा पाया बनून राहिले. पुढे याच पायावर मध्ययुगीन तंत्रज्ञान आणि आजच्या काळातले आधुनिक तंत्रज्ञान उभे राहिले आहे. हा रंजक प्रवास आपण या मालिकेतील पुढील भागात पाहणार आहोत.
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!