तंत्रज्ञानाचा इतिहास : वैश्विक आढावा (भाग ४)
साधारणतः इसवी सन १५०० ते १७५०
मागील भागात आपण तंत्रज्ञानाच्या मध्ययुगीन प्रगतीचा आढावा घेतला. मध्ययुगात तंत्रज्ञान फार संथपणे बदलले, पण या प्रदीर्घ वाटचालीत त्यात नव्या मानकांचा समावेश झाला. मानवाच्या आयुष्यात, कित्येक क्षेत्रांत तंत्रज्ञान हळूहळू रुळत गेले. मध्ययुगात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. मध्ययुगात तंत्रज्ञानाबरोबरच कला, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान आणि व्यापार या क्षेत्रांचाही प्रामुख्याने विकास झाला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतही महत्त्वपूर्ण बदल घडले. पण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा पाया अधिक भरभक्कम झाला तो पुढील सुमारे दीड शतकांत. या भागात आपण याच १५० वर्षांतील तंत्रज्ञानाचा विकास पाहणार आहोत. या काळात लागलेल्या महत्त्वपूर्ण शोधांमुळे आणि वाढत जाणार्या वैज्ञानिक आणि प्रयोगशील दृष्टीकोनामुळे आधुनिकतेकडे जगाची वाटचाल सुरू झाली. (साधारणतः इसवी सन १५०० ते १७५०)
मध्ययुगामध्ये सुरू आणि विकसित झालेल्या व्यापार, वाहतूक आणि अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदलांमुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आणि विकासाला गती प्राप्त झाली. अनेक जुन्या शास्त्रांना, तंत्रांना आणि साहित्याला नव्याने अभ्यासले आणि पारखले जाऊ लागले. प्रयोगशील, वैज्ञानिक आणि शाश्वत विकासाकडे नेणार्या दृष्टीकोनाचे प्रस्थापन होऊ लागले. आतापर्यंत प्राप्त झालेल्या ज्ञानाला अधिकाधीक समृद्ध करण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि संशोधक पुढे आले. लिओनार्डो द विंची हे यातील एक महत्त्वपूर्ण नाव होते. तो अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ होता आणि त्याने कला आणि भौतिक शास्त्रे यांचा सुरेख संगम साधला. त्याने पाणबुड्या, हवाई याने आणि विमाने, यामिकी, अभियांत्रिकी आणि शरीरशास्त्र अश्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय चित्रकला आणि लेखन केले. साधारणतः इसवी सन १५०० ते १७५० या काळात विज्ञानाचे खर्या अर्थाने उपयोजन होऊन तंत्रज्ञान उदयास आले. या सगळ्या प्रगतीचा मुख्य केंद्रबिंदू ब्रिटन ठरला.
या अनुषंगाने पहिला महत्त्वपूर्ण शोध ‘वाफेची शक्ती’ हा ठरला. वाफेमध्ये शक्ती असते हे पहिल्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रियाच्या हेरो याने दाखवून दिले. त्याच्या उपकरणात धातूच्या एका पोकळ गोळ्यात सोडलेली वाफ, त्याला जोडलेल्या दोन नळ्यांमधून बाहेर पडत असे आणि त्यामुळे तो गोळा स्वत:भोवती गोलगोल फिरत असे. मात्र वाफेच्या या शक्तीचा औद्योगिक वापर होण्यासाठी सुमारे १६ शतके जावी लागली. १६९८ साली इंग्लंडच्या थॉमस सेव्हरी याने खाणींमधील पाणी उपसून काढण्यासाठी वाफेवर चालणारे एक यंत्र तयार केले. या यंत्रातील एका टाकीत पाण्याची वाफ सोडली जाई. ही वाफ थंड झाल्यावर तिचे पाण्यात रूपांतर झाल्यामुळे टाकीतील दाब कमी होत असे. यामुळे खाणीतील पाणी या टाकीत खेचणे शक्य होई. मात्र हे इंजिन अखंड चालवता येत नसे व थोडेसे पाणी उपसण्यासाठीही या इंजिनाला बराच कोळसा जाळावा लागे. या इंजिनात १७१२ साली सुधारणा केली ती इंग्लंडच्याच थॉमस न्यूकोमेन याने. न्यूकोमेनने त्याच्या इंजिनात एक दट्ट्या बसवलेला सिलिंडर वापरला. सिलिंडरखालीच बसवलेल्या टाकीतले पाणी उकळून त्याची सतत वाफ होत असे. ही वाफ एका स्वयंचलित झडपेमार्गे सिलिंडरमध्ये शिरून त्यातील दट्ट्या वर ढकलला जात असे. त्यानंतर ही वाफ थंड केल्यावर तिचे पाण्यात रूपांतर होई आणि सिलिंडरमधील दाब कमी होऊन दट्ट्या खाली येत असे. दट्ट्याच्या या हालचालींद्वारे, तरफेमार्फत पंप चालवला जाऊन खाणीतील पाणी उपसता येत असे. परंतु या इंजिनात वाफेचे द्रवीभवन होताना, दट्ट्याचा सिलिंडर बराच गरम राहात असे. त्यामुळे या इंजिनाचीही कार्यक्षमता खूप कमी होती. त्याला इंधनही फार जास्त लागे. पुढे जेम्स वॉटने १७६५ मध्ये या इंजिनात वाफेचे द्रवीभवन करण्यासाठी, वेगळी टाकी वापरली. ही टाकी बाष्पीभवन करणाऱ्या टाकीपासून दूर असल्याने, तिचे तापमान कमी होते. यामुळे वाफेचे पाण्यात रूपांतर जास्त सहज होऊ लागले व उष्णता फुकट न गेल्यामुळे कोळशाचा वापर निम्म्यावर आला. त्यानंतर जेम्स वॉट यानेच केलेल्या बदलामुळे, या इंजिनाच्या दट्ट्याच्या हालचालीद्वारे चाक फिरविणेही शक्य झाले. यानंतर विविध सुधारणा होऊन, या इंजिनाने खाणींमधून वस्त्रोद्योगासारख्या विविध उद्योगांत प्रवेश केला. तसेच रेल्वे उद्योगाचाही पाया घातला गेला. अश्या प्रकारे पाण्याच्या आणि वार्याच्या शक्तीबरोबरच, सक्षम अश्या इंजिनांनी औद्योगिक क्षेत्र वेगवान आणि समृद्ध केले.
जेम्स वॉटचे इंजिन (सौजन्य : DigbyDalton, CC BY-SA 3.0, विकिमिडिया कॉमन्स)
न्यूकोमेनचे इंजिन (सौजन्य : Joost J. Bakker from IJmuiden, CC BY 2.0, विकिमिडिया कॉमन्स)
या काळातील खाणकाम आणि धातुनिर्मितीच्या क्षेत्रांतील उल्लेखनीय बाब म्हणजे दगडी कोळशाच्या वापर. तत्पूर्वी ब्रिटनमध्ये लोणारी (लाकडापासून बनवला जाणारा) कोळशाचाच वापर अधिक होत असे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी झाडे आणि त्यामुळे कमी होत जाणारे लोणारी कोळशाचे स्रोत, यांमुळे पर्यायी स्रोतांचा शोध घेतला गेला आणि दगडी कोळसा हा उत्तम पर्याय ठरला. त्याचा इंधन म्हणून काचकाम, मृण्मयकाम, विटा आणि लोहनिर्मितीतही प्रभावी उपयोग केला गेला. वाफेची इंजिनेही कोळशावरच चालवली जात होती. याव्यतिरिक्त विविध प्रकारची माती वापरून सुंदर नक्षीकाम आणि कलेचा उत्तम नमुना असलेली भांडी आणि इतर वस्तूही तयार होऊ लागल्या. हळूहळू लोह आणि कोळसा यांबरोबरच सोने, चांदी, तांबे, जस्त आणि इतर धातूंचे खाणकामही वाढीस लागले. त्याला जोड मिळाली ती प्रसाराच्या माध्यमांची. आपण हे पाहिलेलेच आहे की टंकाच्या द्वारे छपाईचे तंत्र युरोपात अधिकाधिक स्थिरावत गेले; आणि त्याच माध्यमातून अनेक उद्योग आणि इतरही क्षेत्रांतील ज्ञान प्रसारित होण्यास मदत मिळाली. पुढे त्यातून धातूंना वेगळे काढण्याचे आणि घडवण्याचे तंत्रही विकसित झाले. शिसे आणि कथील या धातूंचीही मागणी वाढली आणि त्यांचेही व्यावसायिक खाणकाम सुरू झाले.
इस्टन कोळसा खाण (सौजन्य : समाजासाठी मुक्तपणे उपलब्ध, विकिमिडिया कॉमन्स)
व्यापाराच्या क्षेत्रांत नवनव्या वस्तूंचा अंतर्भाव होऊ लागला. त्यातून नवनवे उद्योगही निर्माण झाले. चहा, तंबाखू, कापूस, कोको आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण पिकांची आणि त्यांच्यापासून बनणार्या पदार्थांची व पेयांची मागणी वाढली. ऊसापासून मळी, काकवी, साखर आणि तत्सम पदार्थ बनविणारे उद्योग स्थिरावले. तंबाखूचा धूम्रपान आणि तपकिरीसाठी, कोकोचा कॉफीकरिता आणि कापसाचा उत्तम दर्जाच्या कापडाकरिता मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. लोकरीची वस्त्रे, हातमाग आणि यांत्रिक कापडगिरण्या यांचा उद्योगात समावेश झाला. यापूर्वी कापड उद्योग हा छोट्या पातळीवर तसेच घरगुती पद्धतीने केला जात असे. १८व्या शतकाच्या सुरुवातीस वाढत्या मागणीमुळे आणि यांत्रिक शोधांमुळे त्यात अफाट प्रगती झाली आणि कापड उद्योग हा एक मोठा उद्योग म्हणून नव्याने ओळखला जाऊ लागला.
नव्या उद्योगशील, प्रगतशील आणि व्याप्त दृष्टीकोनामुळे शेतीचे रूप पालटले. शेतीकडे एक स्वतंत्र उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वाढ होत चालल्याने तसेच व्यावसायिकता वाढीस लागल्याने अन्नपदार्थांची मागणी वाढू लागली आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार्या या मागणीला पूर्ण करण्यासाठी यांत्रिकतेची गरज निर्माण होऊ लागली. याव्यतिरिक्त शेती ही अधिकाधीक अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिकतेची जोड देऊन करण्यावर भर दिला जाऊ लागला; त्यातून अनेक शेतीविषयक तत्त्वे आणि ज्ञान शोधले जाऊन त्याचा प्रसार होऊ लागला. पशुसंवर्धन आणि आंतरपिके अश्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जाणीवपूर्वक संशोधने केली जाऊ लागली. त्यातून शेती आणि शेतीपूरक उद्योग वाढत गेले. शेतीकडे औद्योगिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले.
बांधकाम आणि स्थापत्य या क्षेत्रांत फार जास्त बदल झाले नाहीत. भाजक्या विटा आणि दगड यांचा पूर्वीप्रमाणेच बांधकामात वापर होत राहिला. लाकडाचा छतकाम आणि जमिनीसाठी उपयोग होत राहिला आणि जिथे दगडांची टंचाई होती तिथे प्रामुख्याने लाकडाचाच वापर होत राहिला. लाकडाचा वापर अगदी १७व्या शतकापर्यंत लोकप्रिय होता. तेथून पुढे मात्र बांधकाम आणि स्थापत्य हळूहळू अधिक नाविन्यपूर्ण होत गेले. विटा आणि फरश्या यांच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आणि त्यामुळे त्यांचा कमी खर्चात सोप्या पद्धतीने वापर करता येणे शक्य झाले. लाकडाचा वापर त्यामुळे कमी झाला. विविध धातू आणि लोखंडाचासुद्धा सजावटीसाठी वापर केला गेला. काचकाम प्रगत झाले. त्यामाध्यमातून काचेवर प्रक्रिया करून तिचाही स्थापत्यकामात वापर केला गेला.
वाहतूकीच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले. त्याची सुरुवात झाली १६९२ साली. मिडीचा कालवा, जो जवळपास २४१ कि.मी. लांबीचा आहे, त्याचे बांधकाम याच साली पूर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या कालव्यामुळे भूमध्य समुद्र आणि बिस्केचा उपसागर यांच्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक सुरू झाली. युरोपातील बर्याच आर्थिक उलाढालीत जलवाहतुकीने फार मोठी भूमिका बजावली. अधिकाधिक अचूक आणि वेगवान जलवाहतुकीसाठी वेगवेगळ्या उपकरणांचा आणि तंत्रांचा विकास सुरू झाला. यामध्ये कोनमानित्र आणि कालमापी यांचा समावेश होता. त्यांनी जलवाहतुकीत प्रभावी प्रगती घडवून आणली.
पारंपारिक रसविद्येचे रसायनशास्त्रांत रूपांतर याच काळात सुरू झाले. रॉबर्ट बॉयल, जॉन डाल्टन आणि अँटोनी लॅव्हिसियर या शास्त्रज्ञांनी रसायनशास्त्राचा पाया घातला. यातून विविध पदार्थांवर प्रयोग सुरू झाले आणि विविध उपकरणे निर्माण होऊ लागली. त्यातून रसायनांवर प्रक्रिया करून त्यातून विविध उत्पादने बनवली जाऊ लागली. यातून पुढे औषधनिर्माणशास्त्रातही प्रगती झाली.
तत्कालीन युरोपीय साखर कारखान्याचे एक उदाहरण (सौजन्य : समाजासाठी मुक्तपणे उपलब्ध, विकिमिडिया कॉमन्स)
मिडीचा कालवा (सौजन्य : Nicoleon, CC BY-SA 4.0, विकिमिडिया कॉमन्स)
अश्या प्रकारे हा १५० वर्षांचा तंत्रज्ञानाच्या विकासाचा कालावधी खर्या अर्थाने त्याला भक्कमपणा प्रदान करणारा ठरला. आधुनिकतेकडे तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू झाली. पुढे याच वाटचालीमुळे तंत्रज्ञानाच्या वापराचा आणि विकासाचा विस्फोट झाला. तंत्रज्ञान सामान्य नागरिकाच्या जीवनाचा भाग बनले. औद्योगिक क्रांतीने जगाचे स्वरूप पालटले. याच औद्योगिक क्रांतीने पुढे आजचे आधुनिक तंत्रज्ञान नावारूपाला आणले. त्याबद्दल आपण पुढील शेवटच्या भागात पाहणार आहोत. औद्योगिक क्रांती आणि त्यानंतरचे जग तंत्रज्ञानाचेच जग म्हणून खर्या अर्थाने ओळखले गेले.
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!