तंत्रज्ञानाचा इतिहास : वैश्विक आढावा (भाग ३)
साधारणतः इसवी सन ५०० ते १५०० पर्यंत
यामागील भागात आपण मध्ययुगाच्या सुरुवातीपर्यंत तंत्रज्ञान कसे विकसित होत गेले हे पाहिले. आता या भागात, आपण मध्ययुगीन तंत्रज्ञानाबद्दल पाहणार आहोत. मध्ययुगीन तंत्रज्ञानाची प्रगती हाच आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया ठरला. आपण या काळात जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत. (साधारणतः इसवी सन ५०० ते १५०० पर्यंत)
मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात रोमन साम्राज्याचा युरोपियन प्रदेशातील प्रभाव हळूहळू संपत चालला. त्यांच्या राज्याला उतरती कळा लागल्याने सर्वच क्षेत्रातील प्रगती खुंटली. फार संथ गतीने व्यवहार चालू लागले. या काळात तंत्रज्ञान फारसे पुढे जाऊ शकले नाही. मात्र, बरबेरीयन लोकांचे या प्रदेशात स्थलांतर होत राहिले. त्यांनी त्यांच्यासोबत नवे तंत्रज्ञान आणले आणि त्याचा पश्चिमी युरोपीय प्रदेशात प्रसारही झाला. मुळातच हे लोक लोहयुगातील यशस्वी वसाहतींपैकी होते आणि त्यामुळे लोहाचा प्रभावशाली वापर त्यांनी केला. त्यांनी आणलेले तंत्र मूळच्या रोमन तंत्रापेक्षा सरस ठरले. संशोधकांच्या मते, याच लोकांनी लोहापासून मजबूत नांगर निर्माण करण्यात यश मिळवले आणि त्यामुळे उत्तर आणि पश्चिम युरोपात टणक आणि जंगली जमिनीवर वसाहती आणि शेती वसवण्यात यश मिळवले.
येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मध्ययुगीन युरोपातील अनेक तांत्रिक शोधांच्या वास्तविक उगमाबाबत अजूनही संशोधकांमध्ये आणि इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. हे शोध स्थलांतरित लोकांनी आणले, की आवश्यकतेतून, गरजेतून मूळच्या युरोपियन वसाहतींतच निर्माण झाले याबाबतीत ठोस माहिती उपलब्ध नाही. काही शोध हे पूर्वेकडील प्रदेशातील वसाहतींमधून वर आले असावेत, तर काही गरजेतून स्वतंत्रपणे निर्माण झाले असावेत, असे संशोधक म्हणतात.
युरोपात असणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे इसवी सनाच्या जवळजवळ १००० पर्यंत युरोपातील व्यापार, उद्योग, नागरी वसाहती आणि तंत्रज्ञानातील प्रगती अस्ताव्यस्त झाली. मात्र, तेथून पुढे पुरेश्या प्रमाणात राजकीय स्थैर्य निर्माण झाले. आणि त्यामुळे, तेथे हळूहळू वसत चाललेल्या वसाहतींनी अनेक क्षेत्रांत नव्याने प्रयोग आणि शोध करायला सुरुवात केली. तेथून पुढे मात्र, तंत्रज्ञान वेगाने प्रगत आणि विकसित होत गेले. जुन्या काळातील आणि अस्तित्वात असणाऱ्याच तंत्रज्ञानावर नव्याने विचार सुरू झाला आणि त्यातून अधिक सक्षम यंत्रणा निर्माण होऊ लागल्या. यातूनच पाश्चात्य तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला.
बायझन्टीन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटीनोपल अर्थात इस्तंबूल, रोमन साम्राज्याच्या अस्तादरम्यानही बराच काळ टिकून होती. हा प्रदेश ग्रीकबहुल असल्याने मूळच्या ग्रीक साहित्याचा आणि संस्कृतीचा तेथे प्रभाव होताच. ग्रीकांनी संपन्न केलेले तंत्र आणि विविध क्षेत्रातील ज्ञान व्यापाराच्या माध्यमातून पश्चिमी युरोपात पोहोचत गेले. इस्तंबूलने पूर्वेकडचे आणि आणि पश्चिमेकडचे युरोपीय प्रदेश एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. या साम्राज्याने स्थापत्य, शस्त्रविद्या, व्यापार, साहित्य, कला, दैनंदिन जीवनातील अनेक छोटे-मोठे शोध आणि संकल्पना यांच्याबाबतीत प्रगती केली आणि त्याचा प्रसार केला.
बायझन्टीन साम्राज्याचे युद्धकौशल्य आणि ‘ग्रीक फायर’ शस्त्र (सौजन्य : समाजासाठी मुक्तपणे उपलब्ध, विकिमिडिया कॉमन्स)
या काळात इस्लामी संस्कृती प्रगतीच्या शिखरावर पोहोचली होती. अनेक क्षेत्रातील ज्ञानाचा आणि माहितीचा प्रसार व्हावा यासाठी अरबांनी जगभरातील विविध संस्कृतींकडून मिळालेले सर्व क्षेत्रातले ज्ञान अरबी भाषेत भाषांतरित करायला सुरुवात केली. त्यामाध्यमातून अनेक जुन्या शोधांचे पुनरुज्जीवन झाले आणि नवे शोधही लागले. यातले काही महत्त्वपूर्ण शोध म्हणजे कोनीय मापपट्टीचे अस्ट्रोलॅब, दातेरी चाके वापरून तयार केलेल्या गिरण्या, रासायनिक प्रक्रिया आणि पदार्थांचे वर्गीकरण, पवनचक्की, धातू आणि त्यांच्यावरील प्रक्रिया आणि सिद्धांत, अंकगणित आणि मूलभूत मोजमापे, काच आणि तिच्यावरील प्रक्रिया, साबण, कच्च्या तेलाचे उर्ध्वपातन आणि त्यावर चालणारे दिवे, पाण्यावर तसेच हवेवर चालणारी चाके वापरून तयार केलेल्या साखरेच्या गिरण्या, पाण्याच्या चक्क्या, वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, भिंगे, फ्लायव्हील आणि इतर यामिकी उपकरणे, भौमितिक मोजमापे; इ. याशिवाय, विविध प्रकारची घड्याळे, यंत्रे, वाद्ये, अस्त्रे आणि ज्वलनशील पदार्थ यांच्याशी संबंधित कितीतरी शोध अनेक मुस्लिम संशोधकांनी आणि तज्ज्ञांनी लावले.
जगातील अनेक शोध सर्वप्रथम पूर्व आशियाई देशात आणि मुख्यत्वे चीनमध्ये लागले. काड्यापेटी, फटाके, कागद, पाण्यावर चालणारे भट्ट्यांचे भाते, पंखे, ओतीव लोखंड, भूकंपमापक, नकाशे, होकायंत्र, दस्त्याचे धनुष्य, बंदुकीची दारू असे कितीतरी शोध चिनी लोकांनी लावले. याशिवाय त्यांनी विहीर खुदाईचे तंत्र आणि मीठ मिळवण्याचे तंत्रही विकसित केले. मध्ययुगीन काळातील त्यांचे काही महत्त्वपूर्ण शोध म्हणजे छपाईचे तंत्र, कागदाचा उत्तम वापर, हलते टंक, चकाकदार रंग, विविध शस्त्रास्त्रे, जहाजे, बोटी आणि स्थायू इंधन वापरणारे अग्निबाण; इ.
व्यापाराच्या तसेच सागरी प्रवासांच्या माध्यमातून विविध पाश्चात्य लोकांचा आशियाई तंत्रज्ञानाशी संपर्क आला. त्यांच्यामुळेच अनेक तंत्रे वेगाने युरोपात पोहोचली आणि स्थिरावली.
पाणचक्की (सौजन्य : Jean-Pol GRANDMONT, CC BY 2.0, विकिमिडिया कॉमन्स)
इ. स. १७६० दरम्यानचे चीनी चुंबकीय होकायंत्र (सौजन्य : Victoria C, CC BY-SA 4.0, विकिमिडिया कॉमन्स)
गॉथिक वास्तुकलेचे एक उदाहरण (सौजन्य : Diliff, CC BY-SA 3.0, विकिमिडिया कॉमन्स)
गुलामांच्या आणि मानवी संसाधनांच्या अभावी, युरोपात नव्या शक्तीच्या स्रोतांचे शोध सुरू झाले. मुख्यत्वे जनावरे आणि यंत्रे यांच्या शक्तीचा उपयोग होऊ लागला. मुख्यत्वे घोडे या कामी वापरले गेले. वारे आणि पाण्याचे प्रवाह ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जाऊ लागले. पाणचक्की आणि पवनचक्की यांचाही वापर वाढला. त्यांचे वेगवेगळे प्रकारही विकसीत झाले.
शेती आणि पशुसंवर्धन या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली. नवनवे ऊर्जेचे स्रोत उपलब्ध झाल्याने शेतीचा वेगाने विकास झाला. धातू आणि अवजारांचा वापर वाढल्याने शेतीचे एकूणच उत्पन्न प्रचंड वाढले. वेगवेगळ्या प्राण्यांचे पालन आणि संवर्धन सुरू झाले. त्यातही अनेक यंत्रांचा वापर सुरू झाला. नवनवी पिके घेतली जाऊ लागली. लोकर आणि रेशीम यांचेही उत्पन्न वाढले. चरख्याचा शोध लागल्यामुळे त्याही कामाला वेग आला.
बांधकाम आणि स्थापत्य क्षेत्रात या काळात प्रचंड प्रगती झाली. रोमनस्क आणि गॉथिक स्थापत्यकला याच काळात विकसित झाल्या. विविध नागरी, धार्मिक आणि संरक्षण क्षेत्रांशी संबंधित अनेक सुप्रसिद्ध आणि सुंदर वास्तू या काळात बांधल्या गेल्या. या काळातील स्थापत्यकारांनी जुन्या शैलींचा आणि बांधकाम पद्धतींचा सुयोग्य अभ्यास करून नवीन स्वतंत्र शैलींचा विकास आणि वापर केला. त्यामुळे या वास्तू अधिकच उठावदार झाल्या.
कांस्याची तोफ (सौजन्य : BabelStone, CC BY-SA 3.0, विकिमिडिया कॉमन्स)
विविध शस्त्रास्त्रे, बंदुकीची दारू, विविध प्रकारच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या इमारती, लाकडाच्या आणि दगडाच्या संरक्षक रचना, धातूंवर प्रक्रिया करण्याचे ज्ञान यांच्यामुळे संरक्षण क्षेत्रात प्रगती झाली. सैन्यदले अधिक समृद्ध झाली. लोखंडी आणि कांस्याच्या तोफा बनवल्या जाऊ लागल्या. कांस्य धातू मुळातच महाग असल्याने, त्याला मोठ्या प्रमाणावर वितळवून त्याच्या तोफा युद्धांमध्ये वापरणे फारच खर्चिक होते. त्यातूनच लोहावर प्रक्रिया करून त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी, लोहाचा अभ्यास सुरू झाला. त्यामुळे लोखंडी अस्त्रे आणि शस्त्रे विकसित झाली. १५ व्या शतकात निर्माण आणि विकसित झालेल्या झोतभट्टीमुळे ओतीव लोखंडाचे तंत्र वापरात आले. फार पूर्वीपासून लोखंडाला वितळवण्यासाठी फार उष्णता आणि बराच वेळ लागत असल्याने लोखंड कधीच व्यवस्थितपणे वितळवता आले नव्हते. पण या शोधामुळे ते शक्य झाले. या भट्ट्यांचा आकार बराच मोठा असल्याने, पाणचक्कीवर चालणाऱ्या भात्यांच्या सहाय्याने त्यांचे तापमान टिकवून ठेवणे आणि वाढवणे शक्य झाले. लोखंडाच्या विविध वस्तू आणि प्रकार निर्माण झाले.
मध्ययुगातील शिडाच्या नौकेचे एक उदाहरण (सौजन्य : I, VollwertBIT, CC BY-SA 2.5, विकिमिडिया कॉमन्स)
मध्ययुगातील शिडाच्या नौकेचे एक उदाहरण (सौजन्य : I, VollwertBIT, CC BY-SA 2.5, विकिमिडिया कॉमन्स)
वाहतूक आणि दळणवळण हा प्रगतीचा कणा असतो. तोही विकासाच्या बाबतीत मागे राहिला नाही. व्यापार, साहित्य, संस्कृती, समाजजीवन यांच्यातील आंतरक्रिया या काळात वेगाने सुरू झाल्या. पूल आणि कालवे यांचे बांधकाम आणि त्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या. मुख्यतः जलवाहतूक जास्त प्रगत झाली. विविध प्रकारच्या बोटी आणि जहाजे यांचाही विकास झाला. मनुष्यबळाचा वापर कमी होऊन जास्तीत जास्त वाऱ्याचा वापर सुरू झाला. सुकाणूचा आकार बदलला गेला आणि त्यामुळे नौकानयनात अधिक कुशलता आली. शिडाच्या नौकांनी प्रवास करणे खूप सोपे झाले. होकायंत्रामुळे दिशा समजणे शक्य झाले. अधिक मजबूत शिडे आणि दोऱ्या, धातूचे उत्तम प्रतीचे नांगर, नौका बांधण्याचे तंत्र आणू मुख्य म्हणजे नौकानयनाचे नकाशे हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. जहाजावर अन्न आणि पाणी वाहून नेण्याचे आणि अधिक काळ टिकवून ठेवण्याचे तंत्र विकसित झाले. या काळातील काही अत्यंत महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक म्हणजे यांत्रिक घड्याळे. ही घड्याळे त्यांना बांधलेल्या वजनाच्या आणि यांत्रिक चाकांच्या माध्यमातून चालत असत. १५ व्या शतकाच्या मध्याच्या आसपास स्प्रिंगांवर चालणारी घड्याळे आली. स्प्रिंगमध्ये साठवलेली ऊर्जा ती प्रसरण पावताना वापरायची, आणि त्या माध्यमातून यांत्रिक संरचनेला गती द्यायची आणि वेळ मोजायचा असे हे तंत्र होते. अश्याच शोधांपैकी दुसरा म्हणजे छपाई यंत्र. १५ व्या शतकात लागलेल्या या शोधाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले. योहान गटेनबर्ग याने सन १४५० च्या दरम्यान जर्मनीतील माइन्स येथे पाहिले छपाईचे केंद्र सुरू केले. अर्थातच छपाईचा यापूर्वीही पूर्व आशियाई प्रदेशात विकास झाला होता; पण युरोपात असे छपाईचे हे पहिलेच केंद्र होते. चित्रे आणि नक्षीकाम छापण्यासाठी लाकडी ठोकळे वापरले गेले. याव्यतिरिक्त टंक आणि शाई यांचाही विकास झाला. कागदाची मागणी वाढली, त्यामुळे कागदाच्या मोठ्या गिरण्या निर्माण झाल्या. पुढे पुस्तके आणि साहित्य फारच वेगाने प्रकाशित होऊ लागले. सामाजिक, राजकीय, धार्मिक, भौगोलिक, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रांत हजारो पुस्तके प्रकाशित झाली.
अश्या प्रकारे मध्ययुगीन काळात जुन्या तंत्रांचे पुनरुज्जीवन आणि विकास झाला. यांत्रिकतेचा आणि यांत्रिक संरचनांचा व्यवहारात वापर वाढला. मनुष्यबळाचा वापर कमी होऊ लागला. विद्येचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामाध्यमातून विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा पाया रचला गेला. भाषा, शिक्षण, संस्कृती, साहित्य, कला तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत सुवर्णकाळ ठरलेल्या या मध्ययुगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा केला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ज्ञानाचा वेगाने होणार प्रसार या प्रगतीस पूरक ठरला.
या भागात आपण मध्ययुगीन तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासाचा थोडक्यात आढावा घेतला. या मालिकेतील पुढील भागात आपण मध्ययुगाच्या शेवटापासून ते औद्योगिक क्रांतीच्या उगमापर्यंतचा कालावधी अभ्यासणार आहोत. हा कालावधी साधारणतः १५० वर्षांचाच आहे; पण त्यामध्ये झालेले बदल हे औद्योगिक क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण अशी पार्श्वभूमी ठरले. मध्ययुगात घातला गेलेला आधुनिकतेचा पाया या काळात कसा भक्कम झाला, ते पाहणे फारच रंजक ठरेल.
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!