तंत्रज्ञान म्हणजे काय ?
जाणून घेऊया तंत्रज्ञानाच्या मूळ संकल्पनेबद्दल..!
तंत्रज्ञान..! हा शब्द तसा आपल्या रोजच्या जीवनातला, वापरातला. आपण प्रत्येकजण या शब्दाशी परिचित आहोत. केवळ परिचितच नाही; तर त्याचा अनुभवही आपण घेतलेला आहे. तंत्रज्ञान या एका शब्दाने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली. मानवाने आज जे काही यश प्राप्त केले आहे, त्यात या तंत्रज्ञानाचा खूपच मोलाचा वाटा आहे. खरं तर तंत्रज्ञान ही एक खूप व्याप्त संकल्पना आहे. या संकल्पनेचा नेमका अर्थ, तिचा उगम, आणि तिची मानवी जीवनातील भूमिका यासंदर्भातील माहिती या लेखात पाहूया..!
तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा अगर संकल्पनांचा वास्तव जीवनात वापर करणे होय. वैज्ञानिक ज्ञान म्हणजे निसर्गाच्या कार्यपद्धतीचे निरिक्षण करून मांडलेले तर्कशुद्ध निष्कर्ष. हे निष्कर्ष कोणीही, केव्हाही व कोठेही प्रयोगाच्या आधारे सिद्ध करू शकतो. हेच निष्कर्ष वापरून आपण काही वस्तू, यंत्रे वा उपकरणे निर्माण करतो. त्यांच्या वापराने आपले दैनंदिन जीवन सोईस्कर होते. आपल्या जीवनात अनेक कामे करत असताना आपल्याला बरेच कष्ट पडत असतात. हे कष्ट कमी व्हावे, कामात जास्तीत जास्त अचूकता यावी, एकाच वेळी अनेक कामे समाधानकारक, सुरक्षित व किफायतशीरपणे पूर्ण करता यावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. या गोष्टी साध्य करण्यास तंत्रज्ञान आपल्याला मदत करते.
Technology या संकल्पनेची व्युत्पत्ती ग्रीक शब्द ‘techne’(τέχνη) आणि ‘logia’ (λογία) यांच्यापासून झाली आहे. ‘Techne’ म्हणजे ‘हस्तकौशल्य’ किंवा ‘कला’. ‘Logia’ म्हणजे ‘शब्द’. थोडक्यात, ‘कोणतीही गोष्ट निर्माण करण्याचे कौशल्य किंवा कला, म्हणजे तंत्रज्ञान’ अशी ढोबळमानाने त्याची व्याख्या करता येईल. याच संकल्पनेला आपण ‘तंत्रविद्या’ असेही म्हणू शकतो.
तंत्रज्ञानाशी संबंधित विज्ञान म्हणजे ‘व्यावहारिक विज्ञान’. विज्ञानाचे ढोबळमानाने दोन मुख्य वर्ग करता येतील – १) सैद्धांतिक विज्ञान (Basic or Theoretical Science) आणि २) व्यावहारिक विज्ञान (Applied Science). यातले दुसर्या वर्गातील विज्ञान हे तंत्रज्ञानात वापरले जाते. विज्ञानातील सर्वच सिद्धांत हे वास्तवात वापरता येत नाहीत. त्यामुळे असे सिद्धांत हे सैद्धांतिक विज्ञानात असतात. जे सिद्धांत वास्तवात वापरता येणे भौतिकदृष्ट्या शक्य आहे, असे सिद्धांत व्यावहारिक विज्ञानात असतात. याच व्यावहारिक विज्ञानातून अभियांत्रिकी ही अभ्यासशाखा निर्माण झाली आहे. अभियांत्रिकीचा हेतू नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करणे आणि ते समृद्ध करणे हा आहे.
थोडक्यात, तंत्रज्ञान ही एक कला आहे. नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची कला. या गोष्टी भौतिकही असू शकतात, आणि वैचारिकही असू शकतात. उदा. भाषा हे एक वैचारिक तंत्रज्ञान आहे; परंतु, त्या भाषेतील मजकूर लिहिणे, बोलणे अगर छापणे हे भौतिक तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान एक कला म्हणूनच उदयाला आले; आणि नंतर विज्ञानाच्या विकासाबरोबर उत्क्रांत होत होत एक वेगळी विचारप्रणाली बनले. जसा विज्ञानाचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो, तसाच तंत्रज्ञानाचाही असतो. विज्ञान हे एखाद्या सिद्धांताच्या सर्व शक्यता पडताळून पाहू शकते. परंतु तंत्रज्ञान हे मुळातच वास्तवात आणि भौतिकतेत बांधलेले असल्याने मर्यादित राहते. उदा. विज्ञानाच्या दृष्टीने ‘टाईम मशीन’ ही संकल्पना अस्तित्वात आहे, आणि वैज्ञानिक नियमांनी सिद्धही झाली आहे; परंतु भौतिकदृष्ट्या काही मर्यादा येत असल्याने प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही..! म्हणून काळामध्ये प्रवास करण्याचे तंत्र आपण कधीच निर्माण करू शकत नाही.
यावरून आपल्याला तंत्रज्ञानाचा नेमका अर्थ समजून येतो. तंत्रज्ञान हे विज्ञानाचे मूर्त रूप आहे; परंतु विज्ञानाप्रमाणे अमर्याद नाही. त्याला मर्यादा आहेत. पण तरीही, त्या मर्यादेतही मानवजातीने त्याचा पुरेपूर वापर करणे शिकून घेतले आहे. त्यातून जास्तीत जास्त नवनिर्मिती केली आहे.
वर म्हटल्याप्रमाणे, तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश कामांत सुलभता आणणे हा आहे. जेव्हा कामांचा किचकटपणा वाढत जातो, तेव्हा ती अवघड, खर्चिक किंवा कधीकधी तर असुरक्षितही होऊ शकतात. तंत्रज्ञान या समस्या सोडवते. तंत्रज्ञानामुळे खालील फायदे होतात :
१. तंत्रज्ञानाच्या वापराने कामे सहजरित्या, कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने पूर्ण होतात.
२. मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने कामामध्ये मानवी चुका होण्याची शक्यता कमी होते. कामाची अचूकता आणि वेग वाढतो.
३. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मनुष्यबळ कमी लागते, कष्ट वाचतात, खर्च कमी होतो.
४. तंत्रज्ञानामुळे जीवन सोपे आणि सहज होते. जगण्याची एकूणएक गुणवत्ता वाढते.
५. तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढते. सुरक्षितता वाढते. आरोग्यावर होणारे परिणाम कमी होतात.
६. तंत्रज्ञानाचा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत वापर करता येतो. त्यामुळे त्या क्षेत्राची ताकद वाढते. त्यातून समृद्ध मानव निर्माण होतो.
७. निसर्गाची होणारी हानी कमी करून परिसंस्था सुरक्षित करता येते. प्राणी व वनस्पतींचे रक्षण होते.
८. तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराने देशाची प्रगती होते. नागरिक सुसंस्कृत व विवेकी होतात.
९. शेवटी अखिल जीवजंतूंच्या कल्याणासाठी (केवळ मानवजातच नव्हे) तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
वरील मुद्द्यांवरून तंत्रज्ञानाची भूमिका आणि व्याप्ती स्पष्ट होते. तंत्रज्ञान हा मानवी बुद्धीचा अप्रतिम आविष्कार आहे. हा आविष्कार सर्वांसाठीच वरदान म्हणून सिद्ध होत आहे. तंत्रज्ञानाने आपले जीवन समृद्ध केलेच, पण त्याचबरोबर शाश्वत विकासाचा मार्गही दिला. मानवाच्या महत्वाकांक्षा तंत्रज्ञानामुळे सुलभरित्या पूर्ण झाल्या आणि त्याबरोबरच मानवाने यशाचे उंचच उंच शिखर गाठले.
तंत्रज्ञानाच्या इतिहासाबद्दल पुढील लेखामध्ये पाहू..!
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!